This podcast discuss about the emerging and futuristic technology innovations from every walk of our life, ranging from our family, home, health, education, society, government, environment, economy up to the space. Every week we shall be talking about ho
TechTalks Series: 12 - Big Data - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur ‘मायनॉरिटी रिपोर्ट' नावाचा एक सिनेमा आहे. त्यामध्ये पोलिस अधिकारी एका गृहस्थाला अटक करताना म्हणतात, ‘आम्ही तुला अटक करत आहोत, कारण तू आज एक खून करणार होतास.' पोलिसांना हे कसं कळलं म्हणून त्या गृहस्थाला आश्चर्य वाटत असलं तरी पोलिसांना ते पूर्वानुमानी (प्रेडिक्टिव) माहितीच्या आधारे समजलेले असते. सध्या अमेरिकेत पुढील 12 तासांत कुठे गुन्हा घडू शकतो, याचा पूर्वानुमान घेत गुन्हा घडण्याआधीच अमेरिकेतील पोलिस गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इंग्लंडमधील व्यापारी आणि शास्त्रज्ञांना गणिताच्या आधारे अब्जावधी रुपये कमावण्याचे गुपित उलगडल्याचा दावा ते करत आहेत. दक्षिण आफ्रिकेत एक खगोलशास्त्रज्ञ संपूर्ण ब्रह्मांड सूचीबद्ध करण्यात व्यग्र आहे. हे सर्व घटनाक्रम एका समांतर धाग्याने जोडले गेलेले आहेत, आणि तो धागा म्हणजे ‘बिग डाटा'. बिग डेटा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिशय वेगाने होणाऱ्या माहिती आदानप्रदानातून मोठ्या प्रमाणात तयार होणारा डिजीटल डेटा. दर दिवसाला आपण जगभरात २.५ क्विंटिलिअन डेटा तयार करत असतो. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे आजमितीला संपूर्ण जगभरात असलेला नव्वद टक्के डेटा हा मागील दोन वर्षात तयार झाला आहे. अब्जावधी फोन्स, सेन्सर्स, सोशियल मेडिया पोस्ट्स, संकेतस्थळे, डिजिटल चित्रे, चलचित्रे, दृकश्राव्य माध्यमे, ईमेल, जिपीएस आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित उपकरणं ही बिग डेटा निर्मितीची मुख्य स्रोत आहे. याच बिग डेटामुळे कंपन्या कशा चालतात, आपण खरेदी कशी करतो, हवामान अंदाज कसे नोंदवले जातात किंवा संशोधन कसे केले जाते, या सर्वांवरच परिणाम होणार आहे. असंख्य तंत्रज्ञ आणि प्रचंड वेगाने काम करणारी शक्तिशाली संगणक प्रणाली यांच्या मदतीने बिग डेटाचे पृथक्करण केले जात असून त्या आधारे अचूक अनुमान बांधले जात आहेत. गूगलवर शोधल्या जाणा-या सर्च टर्म्सचा अभ्यास करून तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात. फेसबुकवर पाठवलेल्या पोस्ट आणि लाइक्सचा अभ्यास करून उत्पादने दाखवली जातात. अमेझॉनवर तुमची वाचनाची आवड लक्षात घेऊन तुम्हाला पुस्तके सुचवली जातात. अमेझॉन, इबेवर तुम्ही नवीन काय वस्तू विकत घेणार ते दर्शवले जाते. प्रशासन स्तरावर बिग-डेटा चा उत्तम वापर करणारे एक चांगले उदाहरण म्हणजे साऊथ कोरियातील सोंगडो हे शहर. त्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि बिग डेटाचा एकत्रित वापर करून शहरातील प्रदूषण, वाहतूक, पाणीपुरवठा, ऊर्जा, कचरा, पार्किंग विषयक समस्या प्रभावीपणे सोडवल्या आहेत. नाशिकसारख्या शहरात देखील कुंभमेळ्यादरम्यान प्रशासनाने बिग डेटा चा प्रभावी वापर करत चेंगराचेंगरी सारख्या गर्दीच्या समस्यांना पूर्णपणे आळा घातला. तसेच लाखो भाविकांच्या अन्न-पाणी, सुरक्षा आणि वाहतुकीची योग्य काळजी घेतली. अमेरिकेतील एलईडी लाईट्स डेटा चा उत्तम वापर करणारे लॉस एंजलिस, पर्यटकांच्या गर्दी नियंत्रणासाठी बिग डेटा आधारे विशिष्ट आकाराचे शांघाय मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम तसेच सौदी अरेबियातील हज यात्रेदरम्यान गर्दी नियंत्रणासाठी मक्का शहर ही बिग डेटाचा पुरेपूर लाभ घेणारी काही उदाहरणं. #bigdata #sunilkhandbahale #innovation #technology #techtalks --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 11 - Bike Sharing - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur सायकल शेअरिंग म्हणजे अल्प काळासाठी व्यक्तिगत वापराकरिता सायकल उपलब्ध करून देणारी सेवा. यामध्ये शहरभर सायकल तळांचे जाळे पसरविले जाते. मासिक अथवा वार्षिक स्वरूपांत नागरिकांना नेटवर्कचे सभासदत्व घेता येते. पर्यटक तात्पुरते सभासद होऊन सेवेचा वापर करू शकतात. वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केलेल्या सायकल्स चोरीपासून सुरक्षित तसेच कमी देखभाल खर्चिक असतात. मिळालेल्या मास्टर-की अथवा सांकेतिक शब्दांचा म्हणजेच पासवर्ड वापर करून सभासद व्यक्ती कोणत्याही सायकल-तळावरून कोणतीही सायकल कधीही वापरू शकतो. सायकल शेअरिंग पर्यायाचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी सभासदत्व मूल्य अतिशय वाजवी आणि सर्वसामान्यांना परवडेल असे ठेवण्यात येते. पार्किंगचा खर्च आणि वाहने सांभाळण्याची जबाबदारी टाळण्यासाठी अनेक लोकं वैयक्तीक वाहने वापरण्यापेक्षा सायकल शेअरिंग नेटवर्कचा वापर करतात. युरोपातील ऍमस्टरडॅम येथे १९६५ साली सुरु झालेला अनोखा सायकल शेअरिंग उपक्रम आजमितीस जगभर पन्नास देशांत सातशे बारा शहरांनी अंगिकारला आहे. चाळीस हजार सायकलतळांवर असलेल्या जवळपास नऊ लाख सायकल शहरी भागांत सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य पर्याय म्हणून समोर येत आहे. परदेशांत मोठ्या संख्येने नागरिक सायकलचा नित्य वापर करताना दिसतात किंबहुना वाहतुकीच्या इतर पर्यायांपेक्षा त्यांना शेअरिंग सायकल अधिक सोयीची वाटते. तेथील सरकारं नागरिकांसाठी सायकल चालविण्याचा अनुभव अधिकाधिक आनंददायी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष सायकल रस्ते निर्मितीसोबतच ‘बाईक-टू-वर्क', ‘बाईक-टू-स्कुल' अशा उपक्रमानंर्गत सायकल संस्कृती रुजवत आहेत. तेथील उद्योजक आणि खासगी संस्था सायकल शेअरिंगकडे एक व्यावसायिक संधी म्हणून बघत आहेत. पॅरिसची वेलीब, वॊशिंग्टनची कॅपिटल बाईक, बोस्टनची हबवे, लॉस एंजेलिसची मेट्रो बाईक, न्ययॉर्कची सिटी बाईक, मिन्नेऑपोलिसची नाईसराईड, मॉन्ट्रिअलची बिक्सी, बर्लिनची कॉल-अ-बाईक, जपानची इको बाईक ह्या कंपन्या उत्तम व्यवसाय करत आहेत. शहरांतील मोक्याच्या ठिकाणी सायकलतळ असल्यामुळे सभासदत्वाच्या ठराविक कमाईसोबतच जाहिरातीच्या माध्यमातून आणि बिग डाटा च्या आधारे भरगोस नफा मिळतो. अनेकदा सायकल शेअरिंग नेटवर्कची सभोवतालच्या संस्था, उद्याने, संग्रहालये, खाजगी कंपन्या, बस-सेवा, रेल्वे, विमानतळ तसेच कार कंपन्यांसोबत भागीदारी असते. एक प्रकारे व्यवसाय वाढीसाठी आणि मुख्य वाहतूक व्यवस्थेस जोडण्यासाठी पूल सिस्टिम म्हणून त्या काम करतात. फ्रांसची विन्सी पार्क त्यांच्या वाहनतळावर गाडी लावल्यास आपल्या ग्राहकांना स्थानिक प्रवासाकरिता सायकल देतात. सॅन फ्रान्सिस्कोची सिटी कारशेअर कंपनीने इलेक्ट्रिक सायकल सुविधाही सुरु केली आहे. सायकल शेअरिंग हा पर्यावरणपूरक आणि आरोग्यवर्धक पर्याय म्हणून पुढे येत आहे. #bikesharing #biking #sunilkhandbahale #techtalks #innovation #technology --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 10 - Community Engagement - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur अनेकदा असे पाहावयास मिळते की सरकार खूप खर्च करून मोठ्या प्रयत्नाने नागरिकहिताच्या काही सेवासुविधा देऊ करतात पण क्वचितच नागरिकांकडून त्यांचा उपयोग होतो. म्हणूनच जगभरातील सरकारे तेथील स्थानिक नागरिकांना मुख्य भागीदार (स्टेकहोल्डर) या नात्याने विकास प्रक्रियेच्या आरंभीपासूनच समाविष्ट करून घेण्यास आग्रही दिसतात. कचरा व्यवस्थापनातून ऊर्जा व इंधन तसेच खत निर्मिती, अक्षयउर्जेची साधने, पर्याय व त्यांची देखभाल, इ-गव्हर्नन्सद्वारे सार्वजनिक माहिती, सुरक्षितेतच्या उपाययोजना व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व्हिडीओ क्राईम मॉनिटरिंग यासोबतच नागरिकांचे कान, डोळे यांची मदत, स्मार्ट मीटर्स, पाणी गळती व पाण्याचा अपव्यय थांबिण्यासाठी पाणी व्यवस्थापन तसेच सांडपाण्याचे नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकतम वापर, स्मार्ट पार्किंग तसेच टेली-मेडिसिनसह डिजिटल शिक्षण अशा अनेक धोरणांच्या अंलबजावणीसाठी तंत्रज्ञानासोबतच लोकसहभाग निर्णायक ठरणार आहे. विकासासाठी लोकांकडूनच वेगवेगळ्या सूचना मागविणे, नवनवीन कप्लना मागविणे, अनेक महत्वाच्या धोरणांवर नागरिकांची मते जाणून घेणे, हरकती मागविणे, कला उपक्रम (आर्ट प्रोजेक्ट्स), छायाचित्र स्पर्धा, डिझाईन, संशोधन स्पर्धा, चर्चासत्रे व परिषदा भरविणे अशा काही उपक्रमांमधून लोकसहभागास प्रोत्सहन देणे असे अनेक प्रयोग जगभरात ठिकठिकाणी राबविले जाऊ लागले आहेत. सक्रिय सहभागामुळे नागरिकांमध्ये सार्वजनिक मालमत्तेविषयी मालकीयत्वाची भावना तर निर्माण होतेच शिवाय उपक्रमांची अमलबजावणी करण्यासाठी व भविष्यातील देखभालीसाठीही नागरिकांचे सहकार्य प्राप्त होते. लोकसहभागाची जगभरात अनेक उत्तम उदाहरणे आहेत. आणीबाणीप्रसंगी उपयोगात येणारी अमेरिकेतील ३-१-१ सेवा, स्थानिक तक्रार नोंदणीसाठी फिनलॅंडची फोरम व्हिरिअम हेलसिंकी सेवा, ऑस्ट्रेलियाची बुश टेलिग्राफ, कॅनडास्थित स्प्रिंगटाइड ही संस्था तेथील प्रशासनासोबत सरकारी धोरणं निश्चित करण्यास मदत करतात व लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी राजकारणाचे नवीन आदर्श ठेवत आहेत. अमेरिकेतील बस प्रोजेक्ट हा डावे किंवा उजवे असे राजकारण न करता फक्त भविष्यवेधी अमेरिका घडविण्यासाठी नेतृत्व तयार करत आहे. सिटीझन इन्व्हेस्टर ही संस्था सामाजिक प्रकल्पांमध्ये लोकसहभागातून गुंतवणूक करते. अमेरिकेतील ओपन टाऊन हॉल ही अशीच एक संकल्पना आहे जिथे नागरिक सरकारी धोरणांवर बेधडक टिकाटिप्पणी करू शकतात. ब्रिटनमधील ‘फिक्स माय स्ट्रीट', क्रिएट फ्रँकफर्ट, नेदरलॅंडचे स्मार्ट सिटिझन्स, न्यूझीलण्डची सेन्सिंग सिटी, इटलीची मॉनिटरिंग मॅरेथॉन असे कितीतरी उदाहरणे देता येतील. सकारात्मक लोकसहभागाची आणखी एक चांगले आणि ओळखीचे उदाहरण म्हणजे कुंभथॉन. कुंभमेळ्यातील अनेक जटिल अडचणी सोडविण्यासाठी शहरातील शाळा-महाविद्यालये, तंत्रज्ञ आणि नागरिक यांनी एकत्रित घेतलेला पुढाकार. #communityengagement #sunilkhandbahale #techtalks #technology #innovation --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 09 - Community Solar - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार विश्वातील एकूण उर्जा कायम स्थिर आहे. ती केव्हाही नष्ट होणार नाही. मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होऊ शकते. म्हणूनच, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाबरोबरच आपल्याला दरडोई ऊर्जा वापर कमी करण्याचे नवनवीन मार्ग शोधायला हवेत. सूर्य हा अनादी काळापासून ऊर्जेचा मुख्य स्रोत राहिला आहे. ऊर्जेचे इतर स्रोत तोकडे पडत असताना, सोलर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सूर्यकिरणांच्या आधारे सौर-ऊर्जा निर्मिती यशस्वी ठरत आहे. परंतु सौरऊर्जा अजूनही प्रचंड महाग असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तसेच शहरी भागात जागेची कमतरता असते आणि अनेकदा खाजगी जागेवर यंत्रणा उभी करण्यास अडचणी येतात. यावर नामी उपाय म्हणजे ‘कम्युनिटी सोलर सिस्टम' यालाच अनेकदा सौर-उद्यान किंवा सौर-शेत असेही म्हणतात ज्यामध्ये सरकारी अथवा खाजगी मिळकतीवर निर्माण केलेल्या सौरऊर्जेचा एकापेक्षा अधिक घरे सहकारी पद्धतीने वापर करतात. उपक्रमासाठी लागणारी जागा ही समुदायातील लोकांच्या मालकीची असणे बिलकुल गरजेचे नाही हा महत्वाचा मुद्दा. एखाद्या छोट्या आकाराच्या जागेत उभा केलेला सौरऊर्जा प्रकल्प हा त्या त्या समुदायाच्या मालकीचा असू शकतो किंवा पूर्णपणे खाजगी देखील असू शकतो. व्हर्चुअल नेट मीटरिंगच्या वापरामुळे, उपक्रमातून निर्माण झालेल्या एकूण ऊर्जेच्या समप्रमाणात समुदायातील प्रत्येक सभासदास वीजबिलामध्ये पैशांची बचत होते. कम्युनिटी सोलर ही नवीन संकल्पना असल्याने त्याकडे जगभर एक नवीन व्यावसायिक संधी म्हणून बघितले जात आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्रांतीमुळे येत्या काळात मानव वैयक्तिक तसेच सामूहिक वापरासाठी ऊर्जा निर्मितीसह सानुकूल आणि नियंत्रित ऊर्जा वापर (कस्टमाईझ्ड अँड कंट्रोल्ड एनर्जी कन्झमशन) साठी प्रयत्नशील आहे. अमेरिकास्थित मोझाईक नावाची कंपनी अशा प्रकारच्या कम्युनिटी सोलर उपक्रमांत गुंतवूणक करण्याची सुविधा पुरवते. अधिकाधिक लोकवस्तींनी कम्युनिटी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी सौर प्रकल्पांतील गुंतवूणकांवर करसवलतीसंह नागरिकांसाठी एकूण प्रक्रिया सोपी करत जगभरातील सरकारं प्रोत्साहन देत आहेत. फ्लोरिडा राज्यातील डेन्व्हर येथे किटसन आणि पार्टनर कंपनीने वर्ष २००६ मध्ये अमेरिकन सरकार, पर्यावरणवादी आणि आयबीएम तंत्रज्ञान कंपनीसोबत एकत्र येऊन तब्ब्ल एक्याण्णव हजार एकरांवर तयार केलेला बॅबकॉक रँच नावाचा अमेरिकेतील पहिला अद्ययावत कम्युनिटी सोलर उपक्रम उभा केला. अमेरिकेत वुई-सन-अलायन्स, मायक्रोग्रीड आणि क्लीन-कोईलन्स सारख्या कंपन्या कनेक्टिकट, मॅसॅचूसेट्स, न्यूजर्सी आणि पेनसिल्व्हेनिया या राज्यांत कार्बन उत्सर्जन कमी करून अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. मेरीलँड येथील युनिव्हर्सिटी पार्क कम्युनिटी सोलर उपक्रम, कोलोरॅडो येथील क्लीन-एनर्जी-कलेक्टिव्ह, कॅलिफोर्नियाचे सोलरशेअर अशी कम्युनिटी सौरऊर्जेची अनेक यशस्वी उदाहरणं आहेत. #communitysolar #sunilkhandbahale #technology #innovation #techtalks --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 08 - Municipal Wireless Network - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी बिनतारी इंटरनेट जाळे निर्माण करून नागरिकांना मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे यालाच ‘म्युनिसिपल वायरलेस नेटवर्क' असे म्हणतात. अमेरिकेसह इतर प्रगत देशांत सब-वे, रेल्वे स्टेशन, बस स्थानकं, धावती वाहनं, वाचनालयं, दवाखाने, विद्यापीठं, चौका-चौकात, अगदी सगळीकडं वायफाय इंटरनेट उपलब्ध असतं. तेथील नागरिक मोफत इंटरनेट असलेल्या रेस्टोरंट मध्ये जेवण घेणं पसंत करतात. व्हर्चुअल जगात वावरणारा तरुण वर्ग कॉफी पिण्यासाठी स्टारबक्स आणि पिझ्झा-बर्गर खाण्यासाठी मॅक्डोनाल्डमध्ये गर्दी करताना दिसतो. मोफत वायफाय इंटरनेट ही स्टारबक्स, मॅक्डोनाल्ड सारख्या खाजगी ब्रॅण्डची एक यशस्वी व्यवसायनीतीच ठरली आहे. मोफत इंटरनेट सुविधा पुरविल्यानं अनेक व्यावसायिकांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. एका सर्वेक्षणात ६२ टक्के व्यावसायिकांनी सांगितलं, की वायफाय क्षेत्र असलेल्या ठिकाणी त्यांचे ग्राहक अधिक वेळ घालवतात आणि ५० टक्के व्यावसायिकांनी सांगितलं, की त्यांचे ग्राहक मोफत इंटरनेट सुविधा सुरु केल्यापासून अधिक खर्च करतात. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणं, अधिभार मूल्य आकारणं आणि संलग्न उत्पादन-सुविधा विक्री यातून अनेक हुशार व्यावसायिक नफा मिळवत आहेत. नागरिकांची मागणी आणि खाजगी सेवा पुरवठादारांचे हे कौशल्य लक्षात घेता अनेक देशांच्या सरकारी यंत्रणा देखील ‘म्युनिसिपल वायरलेस नेटवर्क' चा गांभीर्याने विचार करू लागले आहेत. शहरभर वायफाय जाळे पसरविल्यानं, नागरिक सरकारी सेवांचा जास्तीत जास्त वापर करतील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतील, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, नवसंशोधन वाढीस लागेल, पर्यटन व्यवसायास चालना मिळेल. शहरातील महत्वाची स्थळं, वास्तु, संग्रहालयं, सार्वजनिक प्रेक्षणीय ठिकाणं, शहरात कधी-कोठे-काय घडामोडी, वाहतूक दर आणि वेळापत्रक, बँक-एटीम तसेच दवाखाने, शाळा-महाविद्यालयं, बाजारपेठा, जवळचे मॉल्स, नाट्यगृह आणि इतर महत्वाच्या माहितीपर अथवा मनोरंजनात्म्क घटना यांची माहिती देता येते. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी प्रत्यक्षदर्शी माहिती मिळविण्याचा तो एक सुखद अनुभव तर ठरतोच शिवाय शहरी सामाजिक बौद्धिक आणि आर्थिक विकास वाढीस लागतो. शहराचा सर्वांगीण विकास आराखडा बनविताना अधिकतम माहिती महत्वाची असते. अशा वेळी म्युनिसिपल वायरलेस इंटरनेट च्या माध्यमातून उपलब्ध डेटाचे विश्लेषण करून नागरिकांच्या हिताच्या योजना बनविण्यास मदत होईल. अनेक शहरं वायफाय-सिटी असं स्वतःचं वैशिष्ट्य म्हणजेच ब्रॅंड दाखवून देश-विदेशातून गुंतवणूक आकर्षित करत आहेत. म्युनिसिपल वायरलेस इंटरनेटमुळे प्रशासनाचा जनसंवाद तर वाढेलच शिवाय जाहिरात आणि बिग डेटा च्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचे नवीन साधन देखील निर्माण होईल. #muncipalwirelessnetwork #sunilkhandbahale #techtalks #innovation #technology --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 07 - Internet of Things - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur वाल्ट डिजने कंपनी निर्मित ‘टॉय स्टोरी' किंवा ‘कार्स' नावाचा सिनेमा आठवतो का? ज्यात खेळण्या आणि गाड्या एकमेकांशी बोलतात. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे असच काहीसं प्रत्यक्षात आहे जिथे झाडं, प्राणी, मानव, शहरातील इमारती, रस्ते, हवा, पाणी, गाड्या एकमेकांशी संवाद साधू शकतात. वाटते ना गंमत? पण तंत्रज्ञान क्रांतीमुळे हे शक्य झालंय. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे एक अशी व्यवस्था ज्यात स्वतंत्र ओळख असलेली यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल उपकरणं आंतरजालाद्वारे एकमेकांना जोडलेली असतात आणि इंटरनेटमार्फत मानवाच्या हस्तक्षेपाशिवाय एकमेकांसोबत प्रत्यक्षदर्शी माहितीचे आदानप्रदान करू शकतात. एमआयटी शास्त्रज्ञ केव्हिन अष्टोन यांनी १९९९ मध्ये प्रथमतः इंटरनेट ऑफ थिंग्ज ची संकल्पना मांडली. त्यांच्या मते तत्कालीन उपलब्ध तंत्रज्ञानानुसार संगणकाला पूर्णतः मानवाने पुरविलेल्या टाइपिंग, आवाज अथवा स्कॅन स्वरूपातील माहितीवरच अवलंबून रहावे लागत होते परंतु भविष्यात इंटरनेटक्रांतीमुळे आणि मायक्रो-सेन्सर्सच्या प्रगतीमुळे संगणकाला माहितीसाठी मानवाची आवश्यकता भासणार नाही तर उलटपक्षी संगणकच आपापसात माहितीचे आदानप्रदान करून मानवी जीवन सुसह्य करतील. भौतिक जग, संगणक आणि इंटरनेट यांची एकत्रित प्रणाली मानवाच्या कमीत कमी सहभागाशिवाय बिनचूक आणि अधिक कार्यक्षम यंत्रणा उभारू शकते. मँचेस्टर येथे सिटिव्हर्व उपक्रमांतर्गत स्मार्ट बसथांबे बसविण्यात आले आहेत जिथे प्रवासी प्रतीक्षा करत असल्यास बसचालकाला तात्काळ माहिती मिळते तसेच बसथांब्यावरील स्वयंचलित दिवे फक्त प्रवासी असतानाच गरजेनुसार चालू-बंद होतात. आंतरजाल ( तंत्रज्ञानाचा वापर करून व्हेनिअम नावाची पोर्तुगीज कंपनी शहरातील सर्व वाहनांचे रूपांतर वायफाय हॉटस्पॉट मध्ये करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पोर्टो हे जगातील पहिले असे शहर आहे जिथे घन-कचरा जमा करणाऱ्या गाड्या तसेच बसगाड्यांचा वापर करून फिरते इंटरनेट पुरवले जाते. फिनिश स्टार्टअप इनेवो शहरातील कचरापेट्यांवर सेन्सर्सचा वापर करून त्या किती भरल्या आहेत किंवा कसे याची प्रत्यक्षदर्शी माहिती कचरा गोळा करणाऱ्या आणि कचरा-प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना पुरवते त्यामुळे एकूण कार्यक्षमता वाढल्याचे लक्षात आले आहे. बार्सिलोनास्थित ऊरबायोटिका नामक कंपनी शहरातील वाहनतळ व्यवस्था कार्यक्षम बनविण्यासाठी सेन्सर्सचा प्रभावी वापर करत आहे. बिनतारी सेन्सर्सद्वारे वाहतुकीची प्रत्यक्षदर्शी माहिती वाहनचालकांना पुरविल्यामुळे शहरातील वाहतूक गर्दीची समस्या दहा टक्क्यांनी खाली आणण्यात यश मिळाले आहे. टीझेडओए कंपनीने शहरातील हवेतील प्रदूषण, तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, प्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता मोजण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. भविष्यात आयओटीमुळे शहरी जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत. मानवी शरीर, प्राणी तसेच बांधकाम वस्तूंमध्ये नॅनोसेंसर स्थापित करून वैद्यकीय, शेती, स्थापत्य आणि औषधनिर्मिती क्षेत्रात भविष्यात मोठी प्रगती होऊ घातली आहे. #internetofthings #sunilkhandbahale #techtalks #innovation #technology --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 06 - Smart City & Smart Parking - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur सध्या स्मार्ट सिटी बाबत सर्वत्र चर्चा होताना दिसते. पण नेमकं स्मार्ट सिटी म्हणजे काय? तर स्थानिक नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशानं आधुनिक माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेट आधारित सोयीसुविधांचा योग्य अंतर्भाव असलेले शहर म्हणजे ‘स्मार्ट सिटी'. भारत सरकारच्या ‘स्मार्ट-सिटी-अभियान' अंतर्गत स्मार्ट शहरं करण्याच्या दृष्टीनं व्यापक-विकास, भौतिक, सामाजिक आणि आर्थिक आधारभूत सरंचना अशी मार्गदर्शक चतुर्सुत्री मांडण्यात आलेली आहे, ज्याच्या आधारे असलेली शहरं, स्मार्ट केली जाऊ शकतात तसेच शहरालगत पूर्णतः नवीन नियोजनबद्ध स्मार्ट परिसर देखील वसवला जाऊ शकतो की ज्यामध्ये सर्वकाळ मुबलक पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यविषयक व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम दळणवळण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सामान्य व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या परवडतील अशी घरं, इंटरनेट कनेक्टिव्हीटी, संगणकीकृत ई-प्रशासन, सर्वंकष शिक्षण, स्वच्छता आणि सुरक्षा इत्यादी नागरी सोयीसुविधांचा समावेश अपेक्षित आहे. वाढते शहरीकरण हे एक जागतिक आव्हान आहे. माणसे, प्राणी, कचरा, इमारती आणि वाहनांच्या भाऊगर्दीमुळे आणि अपुऱ्या संसाधनांमुळे शहरं विद्रुप तर सुविधा क्लेशदायक ठरत आहेत. यात आपल्या सर्वाना हमखास भेडसावणारी समस्या म्हणजे कार पार्किंगची. आणि त्यावर उत्तर म्हणजे स्मार्ट पार्किंग अर्थातच अद्ययावत वाहनतळ व्यवस्था.. इथं स्मार्ट पार्किंगसंबंधित एक किस्सा आठवला. अमेरिकेत असताना तेथील एका मित्राला भारतीय पदार्थांची चव द्यावी म्हणून मी माझ्या मोबाईलवर ‘इंडियन रेस्टॉरंट्स अराउंड बोस्टन कॉमन' असं गुगल सर्च केलं आणि दोन तीन पर्याय सुचवले. लागलीच त्यानं स्वतःच्या फोनवर स्मार्ट पार्किंग ऍप उघडलं आणि नेमका कुठे स्पॉट उपलब्ध आहे याची खात्री करून मगच कार सुरु केली. पुढच्या एक तासासाठी पार्किंगच उपलब्ध नसल्यानं नजीकचे दोन पर्याय सोडून थोडं लांबवर जाणं आम्हाला अधिक सोयीचे ठरलं. परदेशांत खोलवर तळघरांत तसेच उंच बहुमजली इमारतींमध्ये कार्यक्षम आणि अतिशय कमी जागेत, खुबीने तयार केलेल्या वाहनतळ व्यवस्था बघताना कमालीचे कौतुक वाटतं. त्यामुळे वेळेची बचत, कमी प्रदूषण आणि सोबतच वाहतुकीदरम्यान होणारा मानसिक त्रास कमी होईल. स्मार्ट पार्किंग पद्धत जगभर योग्य पद्धतीने लागू केल्यास २०३० पर्यंत २,२०,००० गॅलन इंधनाची बचत केली जाऊ शकते. पार्किग व्यवस्थेतून उपलब्ध डेटाचा अभ्यास करून वाहतूक यंत्रणेवरील तणाव कमी करता येतील जसं शाळा, कार्यालयं सुटण्याच्या वेळा निश्चित करणं. रहदारीचा कल लक्षात घेऊन उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण केल्या जाऊ शकतात. #smartcity #smartparking #sunilkhandbahale #technology #innovation --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 05 - Smart Education - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur प्रगत राष्ट्रांत विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत स्मार्ट शिक्षणावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांचा वर्षभराचा डेटा, त्यांची हजेरी, येण्याजाण्याच्या वेळा, सवयी, अभ्यासातील गती, आवडीनिवडी, आरोग्यविषयक माहिती याशिवाय विद्यापीठातील विविध कार्यक्रम, घटनाक्रम, परिषद-कार्यशाळा, व्याख्याने यात विद्यार्थ्यांचा सहभाग अशा महत्वपूर्ण घटकांचे विद्यार्थी केंद्रित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्लेषण केले जाते. स्मार्टफोन, संगणक तसेच वायरलेस नेटवर्कचा वापर करून भेटीच्या वेळा ठरवणे, मुलाखतीची जागा आगाऊ राखून ठेवणे, अभ्यासाचे नियोजन करणे, अभ्यास-गटाचे उपक्रम ठरवणे सोपे झाले. एमआयटी विद्यापीठात स्मार्ट शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणव्यवस्थेतील शिक्षक, विद्यार्थी, प्रशासन यासह प्रत्येक घटक कुठे कमी पडतो, कुठे चांगली कामगिरी होत आहे, सुधारणा करण्यास कुठे वाव आहे आदी माहितीसह एकूणच शिक्षणव्यवस्थेचा स्पर्धात्मक विकास केला जातो. तेथील विविध इमारतींमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला गेला असल्याने विद्यापीठातील एकूणच ऊर्जा, सुरक्षा, दळणवळण, परस्पर-संवाद अधिक कार्यक्षम आहेत. सोबतच आभासी शिक्षण, दृक्श्राव्य माध्यमे, ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षण यामुळे विविध बाह्य-भागीदारांसोबत समकालीन शिक्षण सुलभ आणि सुखावह करण्यात आले आहे. ‘फ्लिप-क्लास' सारख्या शिक्षणपद्धतीमुळे शिक्षकांनी अध्यापन करण्याऐवजी विद्यार्थ्यांनाच स्वयंअध्ययनासाठी उद्युक्त करण्यात येते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचा चेहरामोहराच बदलत चालला आहे. कागदी पुस्तकांपासून तर मोबाईलफोन, संगणक पडद्यावर झळकणाऱ्या डिजिटल शिक्षणसाहित्यापर्यंत, काळ्याकुट्ट फळ्यांपासून ते स्मार्ट-बोर्ड पर्यंत, स्थानिकपातळीपासून ते आंतरराष्ट्रीयस्तरावर मर्यादित संसाधनांचा पुरेपूर वापर करत गरज आणि सोयीनुसार अद्ययावत शिक्षण देणे आणि घेणे शक्य झाले आहे. शिक्षणाचा गुणवत्ता दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची शिक्षण आत्मसात करण्याची पातळी वाढवण्यासाठी स्मार्ट क्लासचा वापर, डेटाआधारित संवादात्मक आणि सहभागात्मक शिक्षण प्रणाली, प्रत्येक विद्यार्थ्यांची व्यैयक्तिक गुंतवणूक, त्याची आवडनिवड कळण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. वर्गातील तापमान, प्रकाश तीव्रता, ध्वनी लहरींची स्पष्टता, कार्बनडायॉकसाईडचे प्रमाण या सर्वांचा विद्यार्थ्याच्या अभ्यासपातळीवर होणार परिणाम अभ्यासणे आणि विद्यापीठ पातळीवर त्याचे विश्लेषण करणे शक्य झाले आहे. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणसाहित्य, शैक्षणिक वातावरण तसेच विद्यापीठं यांचे मूल्यांकन करणे आणि प्रत्येक घटकासाठी स्मार्ट उद्देश निश्चित करणे सोपे झाले आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांना स्वतःच्या कार्यक्षमता डेटामुळे आवश्यक त्या सुधारणा करणे शक्य आहे. शिक्षणप्रक्रियेतून तयार झालेले कुशल मनुष्यबळ, बाजारपेठ आणि उद्योगक्षेत्राची गरज याची योग्य ती सांगड लावली तरच रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. #smarteducation #sunilkhandbahale #technology #innovation #techtalks --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 04 - Smart Health - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur ते चित्र आता फार दूर नाही जेंव्हा भविष्यात संवेदी उपकरणं अर्थात सेन्सर्स आपल्या कळत-नकळत आपले शरीर तपासतील आणि दूरवर असलेल्या आरोग्यतज्ञांशी स्वतःहून संवाद साधतील. मोठ्या प्रमाणात उपलब्ध डेटाचे काही क्षणांत विश्लेषण करून आरोग्यतज्ञ योग्य अशी वैयक्तिकृत औषधयोजना सुचवतील आणि थ्रीडी प्रिंटर लागलीच त्या गोळ्या आपल्यासाठी छापतील. किमान मानवी हस्तक्षेपाशिवाय स्मार्ट हेल्थकेअर यंत्रणा २४ तास आपले कर्तव्य बजावत राहील. वैयक्तिक आरोग्य माहिती शेअर करणे खूपच संवेदनशील असले तरीही बदलत्या काळात उपलब्ध आरोग्यविषयक बिग-डेटा मुळे एकूणच मानवजातीला याचा फायदा होणे शक्य आहे. म्हणूनच स्थानिक तसेच जागतिक आरोग्य समस्यांचा गुंता लक्षात घेता आरोग्य क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यावर पुनःश्च विचार केला जात आहे. बिग-डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि नागरिकांकडून वाढत असलेला एकूणच तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हा आरोग्यविषयक कंपन्या आणि सरकारे यांच्यासाठी अनुकूल ठरत आहे. वर्ल्ड हेल्थ संस्थेनुसार जगभरात ४.३ दशलक्ष तर एकट्या भारतात सहा लक्ष डॉक्टरांची कमतरता आहे. वाढती जागतिक लोकसंख्या आणि आरोग्य क्षेत्रातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता मोबाईल हेल्थला भविष्यात अनन्यसाधारण महत्व असणार आहे. अतिशय कार्यक्षम आणि कमी खर्चिक अशा डिजिटल सेन्सर्सच्या मदतीने वातावरणातील बदल, शुद्धता, तापमान, ध्वनी, कंप, दबाव, पाणी गुणवत्ता, गती, प्रदुषण अशा विविध घटकांचा डेटा जमा करणे शक्य झाले आहे. आर्टिफिशियल इंटीलिजन्स आणि मशीन लर्निंग्जच्या मदतीने उपलब्ध महाकाय माहितीचे पृथक्करण करून दुषित पाणी किंवा अन्नविषबाधा या मागील स्रोत ओळखण्यासाठी विश्लेषण करता येऊ लागले आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून अवकाशातून तुंबलेल्या पाण्याचे निरीक्षण करून रोगराई नियंत्रणात आणता येते. मोबाईल फोन डेटाचा वापर करून लोकांच्या गर्दीचा ओघ आणि त्यांच्या प्रवास सवयी याचा अभ्यास करून झिका सारखे जीवघेणे रोग आटोक्यात आणले जाऊ शकतात. शहरातील कोणत्या ठिकाणी कोणते रोग पसरत आहेत आणि काय उपाययोजना करायला हव्यात यासाठी स्थानिक प्रशासने वैद्यकीय माहितीचा आधार घेत आहेत. प्राप्त माहिती सार्वजनिक करून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण केली जात आहे त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत संभाव्य अफवांनाही आळा बसतो आणि कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होते. प्रगत राष्ट्रांत ‘डिजिटल हेल्थ रेकॉर्ड' च्या माध्यमातून नागरिकांना त्यांची आरोग्यविषयक प्रत्यक्षदर्शी माहिती मिळते ज्यामुळे त्यांना योग्य त्या प्रतिबंधात्मक दक्षता घेणे शक्य होते. व्यक्तीच्या अश्रुंचे विश्लेषण करून शरीरातील ग्लुकोज पातळी मोजणारे गुगल स्मार्ट ग्लास तंत्रज्ञान, ऑर्गन-ऑन-चिप, वाढत्या मधुमेही रुग्णांची संख्या लक्षात घेता रक्तातील साखर नियंत्रणासाठी स्वयंचलित कृत्रिम स्वादुपिंड, स्पर्शविरहित तापमापक अशी नवनवीन उत्पादने भविष्यातील आरोग्यव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकणारी असतील. #smarthealth #sunilkhandbahale #techtalks #technology #innovation --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 03 - Sharing Economy - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur अनेकदा आपल्याला नको असलेल्या वस्तूंचे काय करायचे असा प्रश्न पडतो. बरं देणार तरी कुणाला? नेमका गरजू शोधायचा कुठे? इतका वेळ आहे कुणाकडे? गाडीचा वापर झाला नाही म्हणून बॅटरी कामातून गेली, सुटीत गावाला गेलो तर घरात कोळ्याचे जाळे साचले, चोरीच काय झाली, कार्यालयात असल्याने घरच्या इंटरनेटचा वापर होत नाही तर तर रात्री कार्यालयातील इंटरनेट व्यर्थ, लग्नकार्यांत खंडीभर अन्न वाया जातं, मुलं मोठी झालीत पण खेळण्यांचा घरात पसारा, नवीन फोन घेतला तर जुन्याच काय? वाचून झालेली पुस्तकं, जुनी सायकल, कपडे, चपला-बूट असं एका बाजूला चित्र तर दुसरीकडे गरजवंत अनेक. अगदी कधीतरीच वापरात येणाऱ्या अशा किती तरी वस्तू (आयडियल ऍसेट्स) आपण प्रत्येकजण बाळगून आहोत. जरा कल्पना करा की सर्वानी दर वेळी प्रत्येक वस्तू नवीन खरेदी करण्यापेक्षा शक्य तेंव्हा आपापसात शेअर केली तर? यालाच ‘शेअरिंग इकॉनॉमी' अर्थात ‘सहभागी अर्थव्यवस्था' म्हणतात, म्हणजे अशी अर्थव्यवस्था की जिथे नागरिक त्यांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्ता आणि सेवा एकमेकांना परस्पर सामंजस्यातुन मोफत किंवा अल्प दरात देऊ-घेऊ शकतात. प्रगत राष्ट्रांत अनेक नागरिक आपल्या वस्तू स्वतःला गरज नसताना दुसऱ्याला वापरायला देतात परंतु उगाच बिनकामी पडून राहू देत नाहीत. त्यातून त्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळते आणि वस्तू सुस्थितीत देखील राहतात. याचे प्रमुख कारण म्हणजे तिकडे परस्पर देवाणघेवाण प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. त्याचे श्रेय जाते तंत्रज्ञानाला. एअरबीअँडबीमार्फत आपण संपूर्ण स्थावर मालमत्ता अथवा घराचा काही भाग भाड्याने देऊन उत्पन्न मिळवू शकतो, डॉगव्हॅकि कंपनी परिसरातील लोकांना पाळीव प्राण्यांची सेवा-सुश्रुषा करण्याचे रोजगार उपलब्ध करून देते, गुगलप्रणीत रिलेराइड्स कंपनी ऍप द्वारे शेजाऱ्यांची गाडी तासावर किंवा दिवसभरासाठी आपण भाड्याने घेऊ शकतो. झारली आणि टास्करॅबिट सारख्या कंपन्या संकेतस्थळांमार्फत घरकामाच्या सेवा-सुविधा पुरविणाऱ्यांना रोज हजारो रोजगार उपलब्ध करून देतात. लिफ्ट, उबर, ब्लाब्लाकार आणि गेटअराउंड सारख्या कंपन्या कार शेअरिंगचे अनेक पर्याय देतात. लिक्विड नावाची स्टार्टअप सायकल उपलब्ध करून देते. ‘फोन' या जागतिक वायफाय शेअर नेटवर्क मार्फत इंटरनेट शेअर केल्याच्या बदल्यात आपल्याला जगात कुठेही इंटरनेट मोफत मिळते. ओएलएक्स, झूमकार, काऊचसर्फिंग, फेअरसेंट, लेन्डिंग क्लब सारख्या अनेक प्रगत कंपन्या शेअरिंग इकॉनॉमी बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवत आहेत तसेच अनेक स्टार्टअप्स नवनवीन तंत्रज्ञान घेऊन शेअरिंग इकॉनॉमी बळकट करण्यासोबतच उत्तम व्यवसाय देखील करत आहेत. #sharingeconomy #sunilkhandbahale #technology #innovation #techtalks --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 02 - Open Data & Wisdom of Crowd - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur ‘ओपन-डेटा' अर्थात ‘मुक्त-आधारभूत माहिती' म्हणजे अशी माहिती जी सरकारी, निमसरकारी, सेवाभावी तसेच खाजगी संस्थांद्वारे अधिकृत संकेतस्थळांवर नियमित प्रकाशित केली जाते आणि जी जनहितार्थ विनानिर्बंध सार्वजनिक केलेली असते. ‘ओपन-डेटा' चा मूळ उद्देश राष्ट्रीय संसाधनांचा इष्टतम उपयोग, आर्थिक अभिवृद्धी, लोकसेवेचा दर्जा, क्रयशीलता, आर्थिक मूल्य सुधारणे यांसोबतच सरकारी उत्तरदायित्व निर्माण करणे आणि नागरिक-प्रशासन यातील संवाद वाढवून सरकारी कामकाजात पारदर्शकता निर्माण करणे असा असतो. ज्याचा फायदा केवळ संस्था आणि नागरिक यांनाच नाही तर ‘डीप-डेटा-लर्निंग' म्हणजे माहिती-आदानप्रदान प्रभावाचा सखोल अभ्यास करून नवनवीन लोककल्याणकारी योजना आखण्यासाठी खुद्द सरकारलाही होत असतो. आजमितीला जगभरातील निम्म्याहून अधिक देशांनी ह्या खुल्या माहितीच्या धोरणाचा पुरस्कार केला आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत सरकार देखील यात अग्रेसर आहे. भारत सरकारद्वारा डेटा.जीओव्ही.इन या अधिकृत संकेतस्थळामार्फत केंद्र सरकारच्या १०३ विभागांच्या सुमारे पन्नास हजार संसाधनांच्या चार हजारहुन अधिक विषयसूची अहवाल उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. ह्या उपलब्ध माहितीवर आधारित देशातील अनेक तरुण स्वतःच्या स्टार्टअप्स सुरु करत आहेत. सोशल मिडिया आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वाना ‘विस्डम ऑफ क्राउड' चे महत्व समजले आहे. ‘विस्डम ऑफ क्राउड' म्हणजेच ‘जनशक्तीचे एकत्रित ज्ञान' अर्थात जटील समस्यांच्या निराकारणाचा प्रयत्न एकट्या-दुकट्या व्यक्तीने, संस्थेने अथवा समुदायाने करण्यापेक्षा व्यक्तिगत स्वरूपात जगभर विखुरलेले जे ज्ञान आणि कौशल्य आहे यांच्या एकत्र प्रयत्नाने सर्वसमावेशक असे प्रभावी उत्तर शोधण्यावर अनेक देश सध्या भर देत आहेत. विविध वाहतूक मार्गांवरील वाहनांच्या गर्दीची प्रत्यक्षदर्शी स्थिती कळावी यासाठी लोकसहभागातून तयार झालेले ‘वेज' नावाचे अँप, नकाशांसाठी प्रसिद्ध गुगल मॅप्स, मुक्त आणि मोफत ज्ञानकोश म्हणजे विकिपीडिया, संगणक प्रणाली लिनक्स, मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउजर, जगप्रसिद्ध खेळण्यांची कंपनी लेगो, एअरबी अँड बी अशा यशस्वी क्राउड-सोर्स्ड उदाहरणांतून प्रभावित होत ‘ओपन-डेटा' धोरण पक्के होत गेले. प्रगत राष्ट्रांमध्ये ‘ओपन-डेटा' आणि ‘विस्डम ऑफ क्राउड' च्या माध्यमातून सामाजिक संशोधन आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान निर्मितीस बळ मिळत आहे. त्यामुळे डेटा-विश्लेषण, डेटा सादरीकरण, डेटा-पत्रकारिता ही क्षेत्रे वाढीस लागत आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे देशातील विद्यार्थी, तंत्रज्ञ आणि उद्योजक दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी ‘डेटा-ड्रिव्हन-टेकनॉलॉजि-सोल्युशन्स' अर्थात माहिती आधारित तंत्रज्ञान सुविधा निर्माण करत आहेत. #opendata #wisdomofcrowd #sunilkhandbahale #technology --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message
TechTalks Series: 01 - Futuristic Technology - by Sunil Khandbahale, MIT Sloan Fellow, Technologist, Innovator & Entrepreneur विचार करा की आपली घरं आता फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रात आणि आकाशात देखील असतील, विनावाहक मोटारगाड्या फक्त रस्त्यावरच चालताना नाही तर आकाशातही उडताना दिसतील, हजारो मैल असलेले आपले आप्तस्वकीय फक्त संगणकाच्या पडद्यावरच नाहीत तर अगदी आपल्या जवळ असलेली भासतील आणि एवढंच नाही तर तुम्ही हजारो वर्ष निरोगी आयुष्यमानाचीही अपेक्षा धरू शकता. अतिशयोक्ती वाटते ना? पण हे नजीकच्या काळात प्रत्यक्षात आल्यास आश्चर्य वाटू नये. कारण जगभरात असेच एक ना अनेक प्रयोग यशस्वी करण्यात कैक शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. आताचे युग हे माहितीच्या आदानप्रदानाचे युग आहे. २.५ क्वेन्टीलियन डाटाची निर्मिती दर दिवसाला होत असते. फेसबुक कनेक्टीविटी उपक्रमांतर्गत सौरउर्जाचलित इंटरनेट विमान, गंभीर अपघातात अथवा शस्त्रक्रिया करताना केवळ १२ सेकंदात रक्तस्त्राव थांबवू शकेल अशा शेवाळ आधारित जेलचा शोध, जिभेवर ठेवताच तत्काळ विरघळणारी ३-डी प्रिंटेड औषधी गोळी, अतिवृष्टीच्या परिस्थितीत जलप्रलय टाळता यावा यासाठी १ मिनिटात ३००० लिटर पाणी शोषणारे सिमेंट, मानवी मलमूत्रापासून शुद्ध पाणी आणि उर्जानिर्मिती, डीएनए मध्ये आवश्यक बदल घडवणारा शोध, इबोला रोगप्रतिबंधक लस, रोगप्रतिबंधक डास, कार मध्ये परावर्तीत होणारे विमान आणि केवळ ५०० रुपयांत संगणक निर्मितीचे संशोधन शक्य झाले आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज च्या प्रभावामुळे २०२० पर्यंत साधारणतः ३ हजार कोटी साधने एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. मानवी शरीर तसेच बांधकाम वस्तूंमध्ये नॅनोसेंसर स्थापित करून वैद्यकीय, शेती, स्थापत्य व औषधनिर्मिती क्षेत्रात मोठी प्रगती होऊ शकेल. सोडियम, झिंक आणि अल्युमिनियम आधारित बॅटरी मुळे पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि २४ तास खात्रीशीर वीज मिळू शकेल अशी अक्षयऊर्जा निर्मिती शक्य आहे. ऑटोनॉमस व्हेईकल अर्थात सेल्फ-ड्रायव्हिंग कार मुळे अपघात तसेच संभाव्य जीवितहानी टाळणे, प्रदूषण निर्मूलन आणि जेष्ठ तसेच दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुखकर होण्यास मदत होणार आहे. सभोवतालच्या वाय-फाय तसेच दूरभाष लहरींच्याद्वारे आपली इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं विद्युतभारित करणं शक्य आहे. भविष्यात इमारती, रस्ते, गाड्या आपल्याशी मानवाप्रमाणे संवाद करू लागल्यास आश्चर्य वाटू नये. रोबोट्स रोबोट्सला शिकवतील, धुळीच्या प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी व्यक्तिगत हवा-शुद्धक यंत्र, संततीहीन जोडप्यांसाठी अगदी खऱ्या वाटाव्यात अशा भावनायुक्त बाहुल्या, ऑर्गन-ऑन-चिप, मधुमेही रुग्णांच्या साखर नियंत्रणासाठी स्वयंचलित कृत्रिम स्वादुपिंड, स्पर्शविरहित तापमापक, भुकंप-रोधक बिछाना, घडी घालता येऊ शकेल असे दुचाकी शिरस्त्राण, हवेत तरंगणारी उत्पादनं, असं बरच काही भविष्यवेधी तंत्रज्ञान जगाचं भविष्य घडविण्यास सज्ज झालं आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/sunil-khandbahale/message